सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’चा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी मधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. शनिवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या गावठी बाजाराचे उदघाटन केले जाणार आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील बस स्थानकाच्या बाजूलाच हा गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. या गावठी बाजारामध्ये स्थानिक सेंद्रीय शेती माल विक्री, थेट शेतकरी ते ग्राहक विक्री अशा पद्धतीने गावठी बाजार भरविला जाणार आहे. या गावठी बाजारामुळे पंचक्रोशीतील लोकांना ताजी भाजी, वेगवेगळी फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गावठी कडधान्य बाजारात मिळणार आहेत. तसेच लोकांना सेंद्रीय पद्धतीचे सर्व प्रकारचे धान्य व भाजी मिळणार आहे. त्यामुळे लोकांची तर सोय होईलच त्याचबरोबर ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या गावठी आठवडा बाजारामुळे शेतकऱ्यांनी आपलं उत्पादित केलेला माल विक्रीसाठी आणावा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी खरेदी करून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी केले आहे.
सिंधुदूर्गनगरी येथे दर शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अस्सल गावठी आठवडा बाजार भरविला जाणार आहे. या पहिल्याच आठवडा बाजाराचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार असून सोबतच सिंधुदूर्गनगरी प्राधिकरण सदस्य व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, प्राधिकरण सदस्य छोटू पारकर, भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष भाई सावंत उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.