मालवण : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केला आहे. यावर मालवण मधील दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी व मच्छिमारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रत्नागिरीतील पर्ससीन नौका सिंधुदुर्गात १२ सागरी मैलाच्या आतमध्ये येऊन मासळी घेऊन जात असल्याने स्वतः बेकायदेशीर मासेमारी करुन चोरी करायची आणि दुसऱ्यांना लूटारु म्हणायचे हे बरोबर नाही, अशी टीका रामेश्वर सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी करत रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात येऊन अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या रत्नागिरीमधील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांच्या बैठकीत सिंधुदुर्गातील मच्छिमारांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. रत्नागिरीच्या समुद्रात मासळी मिळत नसल्याने रत्नागिरीतील काही पर्ससीन नौका सिंधुदुर्गच्या समुद्राट मासेमारी साठी गेले असता सिंधुदुर्गातील काही नौका घोळक्याने येऊन पर्ससीन नौकांवरील मासळी लुटतात, मारहाण करतात असे आरोप करण्यात आले होते. या आरोपांवर सिंधुदुर्गातील मच्छिमारांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी संस्थेने मत्स्य विभागाला निवेदन सादर केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश खराडे, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, नगरसेवक महेश कोयंडे, सुजित मोंडकर, रामचंद्र पराडकर, देवानंद मोंडकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाने एकाही पर्ससीन नौकेला एकही परवाना नसताना रत्नागिरीतील पर्ससीन नौका तेथील बंदरातून मासेमारी करण्यासाठी सिंधुदुर्गात येतात कशा ? १२ सागरी मैलाच्या आत ऑक्टोबर ते डिसेंबर या चार महिन्याच्या कालावधीत अधिकृत परवानाधारक पर्ससीनवाले ठरवून दिलेल्या क्षेत्रात मासेमारी करु शकतात. आता मे महिना सुरु असताना अवैध पर्ससीन नौका १२ सागरी मैलाच्या आत मासेमारी करतातच कसे ? रत्नागिरीतील मत्स्यविभागाने ड्रोन सहाय्याने वर्षभर कारवाई केलेल्या अवैध पर्ससीन नौका जप्त का केल्या नाहीत? अद्यापही त्या मासेमारीस कशा जातात ? असे सवाल रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी निवेदनातून उपस्थित केले आहेत. मत्स्य विभागाने तात्काळ या अवैध पर्ससिन नौकांना पकडून योग्य ती कारवाई करावी. या पर्ससिन नौकांवर तात्काळ कारवाई न केल्यास मत्स्यविभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी उपस्थित मच्छिमारांनी दिल्या.












