देवगडमध्ये प्रथमच ‘Venticast’चा वापर – अत्याधुनिक प्लास्टर तंत्रज्ञानाची सुरुवात

देवगड तालुक्यातील आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला असून, देवगड मेडिकल फाउंडेशन (DMF) येथे प्रथमच ‘Venticast’ या अत्याधुनिक प्लास्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांनी फ्रॅक्चरच्या उपचारासाठी या नव्या पिढीच्या प्लास्टरचा यशस्वी वापर केला असून, यामुळे देवगड हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वापरणाऱ्या ठिकाणांमध्ये अग्रस्थानी आले आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण भारतात सध्या केवळ पाच ठिकाणीच ‘Venticast’ चा वापर केला जात असून, त्यामध्ये देवगडचा समावेश झाला आहे. ग्रामीण भागात अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे देवगड मेडिकल फाउंडेशन हे एकमेव केंद्र ठरले आहे.
‘Venticast’ हे पारंपरिक प्लास्टर ऑफ पॅरिसला (POP) व सिंथेटिक कास्ट (Fibreglass) ला पर्याय म्हणून विकसित केलेले एक अत्याधुनिक, हलके व हवेशीर (breathable) प्लास्टर आहे. या प्लास्टरमुळे रुग्णांना येणारी खाज, घाम, दुर्गंधी आणि जडपणा यांसारख्या समस्या कमी होतात, तसेच फ्रॅक्चरला आवश्यक आधारही मिळतो.
या नव्या तंत्रज्ञानाच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये –

  • हवेशीर रचना (Breathable Design) – प्लास्टरमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे उष्णता व ओलावा कमी होतो.
  • आरामदायी व स्वच्छ (Comfort & Hygiene) – खाज, घाम आणि जडपणापासून मुक्तता.
  • अत्यंत हलके (Lightweight) – रुग्णांच्या हालचालींमध्ये अधिक सोय.
  • त्वचेसाठी सुरक्षित (Skin-Friendly) – हायपोअ‍ॅलर्जेनिक व दुर्गंधीमुक्त.
    डॉ. तन्मय आठवले यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील रुग्णांना शहरांप्रमाणेच अत्याधुनिक उपचार मिळावेत, हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. Venticast सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे रुग्णांचा उपचार अनुभव अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.”
    या उपक्रमामुळे देवगड मेडिकल फाउंडेशनने पुन्हा एकदा ग्रामीण आरोग्यसेवेत नव्या तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.