निरवडे-तळवडे मार्गाचे काम जैसे थे; पावसात नागरिकांचे हाल

सावंतवाडी :  निरवडे झरबाजार ते तळवडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातरण आहे. संबंधित ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे लोकप्रतिनिधींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी वारंवार सूचना देऊनही ठेकेदाराने कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

सध्या पावसाळा अगदी तोंडावर आला असून हे काम तातडीने पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. जर पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही. तर या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याकडे पेडणेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

रस्त्याची साईड पट्टी अद्याप भरलेली नसल्याने पावसात या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः दोन चारचाकी गाड्या समोरासमोर आल्यास गाडी रस्त्याच्या खाली उतरवणे आता कठीण झाले आहे. त्यातच एका ठिकाणी रस्त्याचा सुमारे १०० मीटर भाग करण्यासाठी एका बाजूने पूर्ण माती काढून खड्डा करून ठेवला आहे. यामुळे दुसऱ्या बाजूने वाहन चालवताना मोठी दुर्घटना घडू शकते. या कामासाठी रस्त्याच्या कडेची माती काढल्याने तेथील विद्युत व इतर पोल सुद्धा जीर्ण झाले असून ते कधीही कोसळू शकतात.

या निष्काळजीपणामुळे जर भविष्यात मोठी मनुष्यहानी किंवा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले भगदे आणि कामाचा एकूण दर्जा पाहता ग्रामस्थांमध्ये मोठा रोष आहे. ठेकेदाराच्या या दिरंगाईमुळे आता लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच, येत्या दोन दिवसांत हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा लोकांना सोबत घेऊन संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी दिला आहे. संबंधित विभागाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी आणि काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.