अवैध लिंगनिदानाविरोधात कुडाळात जनजागृतीची हाक; विधी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण

कुडाळ : अवैध लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधात समाजात प्रभावी जनजागृती निर्माण करण्यासाठी कुडाळ येथे विधी स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका वकील संघटना, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालरुग्णालय येथे हा कार्यक्रम पार पडला.
मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार, कुडाळचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाळके उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान डॉ. संजय वाळके यांनी ‘PCPNDT Act, 1994’ या कायद्याबाबत सखोल माहिती दिली. देशात मुलींचे घटते प्रमाण आणि लिंगनिदानामुळे होणारे बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी या कायद्याची कडक अंमलबजावणी किती आवश्यक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वाय. एम. वेंगुर्लेकर यांनी या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया आणि पोलिसांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कुडाळ वकील संघटनेच्या अॅड. सायली कुडाळकर यांनी कायद्यातील विविध तरतुदी आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
या विशेष प्रशिक्षणाचा लाभ कुडाळ न्यायालयातील विधी स्वयंसेवक पल्लवी जाधव, श्वेता कोळी, सिद्धेश पाताडे, गुरुनाथ दामले, सान्वी शिंदे यांच्यासह महिला व बालरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक आर. टी. आरेकर आणि जोगेश चव्हाण यांनी केले.