संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेत मतदार नोंदणी, वास्तव्याचा पुरावा, घरभेट, दुबार नावे तसेच पडताळणीच्या निकषांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करत श्री. संदेश भास्कर पारकर यांनी प्रशासनाकडे सविस्तर लेखी माहितीची मागणी केली आहे. संबंधित माहिती १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध करून न दिल्यास १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पारकर यांनी सादर केलेल्या निवेदनात SIR प्रक्रियेतील नियम, कार्यपद्धती, वास्तव्याचा पुरावा स्वीकारण्याचे निकष, विविध आडनावे, जाती किंवा धर्माच्या व्यक्तींचे एकाच घर क्रमांकावरील वास्तव्य, एका पत्त्यावर मतदारांची मर्यादा, तात्पुरते बाहेर वास्तव्यास असलेल्या मतदारांची पडताळणी, विवाहानंतर महिलांच्या मतदार नोंदणीची प्रक्रिया, ऑनलाइन व ऑफलाइन अर्जांची कार्यपद्धती, घरभेटीचे निकष, दुबार मतदारांची नावे निश्चित करण्याचे नियम, मतदार ओळखपत्र व आधार कार्डावरील वेगवेगळ्या पत्त्यांची पडताळणी तसेच भाडेकरू, पगडीधारक व मालकी हक्क नसलेल्या नागरिकांच्या वास्तव्याच्या पुराव्याबाबत लागू असलेले नियम, परिपत्रके, मार्गदर्शक सूचना, अभिलेख व आकडेवारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मतदान केंद्रनिहाय आकडेवारी, पडताळणी अहवाल, मंजूर, नामंजूर व प्रलंबित अर्जांची संख्या, BLO यांनी केलेल्या घरभेटींचा तपशील तसेच संबंधित कार्यवाहीची लेखी माहिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
SIR प्रक्रिया सार्वजनिक निधीतून राबविण्यात येत असून ती पूर्णपणे पारदर्शक, निःपक्षपाती व कायदेशीर पद्धतीने पार पडावी, तसेच कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होऊ नये, या उद्देशाने ही माहिती मागविण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मागितलेली माहिती १३ ऑगस्टपर्यंत उपलब्ध न झाल्यास मतदारांच्या न्याय हक्कासाठी १५ ऑगस्ट रोजी कणकवली येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा संदेश पारकर यांनी प्रशासनाला दिला आहे.












