महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार नुकतेच स्थापन झाले असून, राज्यात भाजपाने मोठे यश मिळवीले आहे. आज भाजपा सदस्यता नोंदणी प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. वेंगुर्ले नगरपरिषद आज राज्यभर व देशभर आदर्शवत असून, शहरात तसेच संपूर्ण तालुक्यात भाजपाचे सदस्य वाढवून भाजपाची ताकद आणखीन वाढवा. आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी आतापासूनच सर्वांनी एकदिलाने काम करा. या तालुक्याला, शहराच्या विकासाला मोठा भरीव निधी आपल्यामार्फत निश्चितच दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे दिली.
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान 2025 अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, माजी उपनगराध्यक्ष शितल प्रभूखानोलकर, माजी नगरसेवक नागेश गावडे, मच्छीमार नेते वसंत तांडेल, माजी उपनगराध्यक्ष दाजी परब आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










