सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या 10 क्रमांकांत आणण्याचे प्रतिपादन ; मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे..

वेंगुर्ले जिल्हा नगरपरिषद प्रशासनामार्फत क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव प्रशासनासाठी पोषक आहे. जिल्ह्यात अशा महोत्सवामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. मंत्री म्हणून आपल्याला राज्याचा व जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे. तसेच जिल्हा समृद्ध करावयाचा असून आपल्या जिल्ह्याला राज्यात पहिल्या 10 क्रमांकांत आणायचे आहे, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे केले.


वेंगुर्ले येथे महाराष्ट्र शासन नगरपरिषद विभागामार्फत तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव झाला. या महोत्सवाचे बक्षीस वितरण रविवारी वेंगुर्ले कॅम्प येथील न. प. च्या नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात ना. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ले मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलिस निरीक्षक संदीप भोसले, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मालवण मुख्याधिकारी संतोष जिरगे, कुडाळ मुख्याधिकारी अरविंद नातू, सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.