शिरोडा येथे भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन

शिरोडा : सनातन हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने शिरोडा येथे भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, गुरुवर्य अ.वि. बावडेकर विद्यालय आणि बी.एम. गोगटे ज्युनिअर कॉलेजच्या पटांगणावर पार पडणार आहे.

संपूर्ण विश्वात प्राचीन, अनुकरणीय आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या सनातन हिंदू धर्माचा गौरव वाढविणे आणि सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर पुनर्निर्माणानंतर निर्माण झालेल्या अभिमानाच्या भावनेला अधिक बळ देत समाजातील ऐक्य वृद्धिंगत करण्याचा यामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून श्रीनिवास दिनकर पेंडसे (व्याख्याते व प्रवचनकार, संगमेश्वर) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून वेदमूर्ती दत्तात्रेय महादेव मुरवणे गुरुजी (मालवण) आणि हरेकृष्ण भगवान पोळजी महाराज (आसोली) यांची उपस्थिती लाभणार आहे.

संमेलनाच्या निमित्ताने दुपारी ३.३० वाजता श्री देवी माऊली मंदिर, शिरोडा येथून संमेलन स्थळापर्यंत पारंपारिक मंगल वेशभूषेत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकल हिंदू संमेलन समिती, शिरोडा मंडळ यांनी सर्व हिंदू बांधव-भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.