कणकवलीत चोरीच्या माहितीने पोलिसांची तारांबळ; गुन्हा दाखल न करताच प्रकरण संपले!

कणकवली : कणकवली तालुक्यातील एका गावात काही व्यक्तींनी घरात घुसून दागिने चोरल्याची माहिती एका युवकाने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांचीही एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने गावात धाव घेत पाहणी केली. मात्र, युवक देत असलेली माहिती विसंगत असल्याने हा बनाव असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
कणकवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी एका युवकाने येऊन आपल्या घरात काही व्यक्तींनी घुसून महिलेला धमकी देत दागिने चोरून नेल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. मात्र, प्रत्यक्षात तेथे तसा काही प्रकारच घडला नसल्याचे चौकशीत आढळून आले. घरातील कपाटातील ड्रॉव्हरमध्ये दागिने तसेच होते. मात्र, त्यामध्ये एक चेन दिसून येत नव्हती, असे घरातील सदस्यांचे म्हणणे होते, मात्र, युवक व घरातील महिला देत असलेली माहिती विसंगत व तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानंतर त्या युवकानेही आपली कोणती तक्रार नसल्याचे सांगितल्याने कोणताही गुन्हा दाखल नव्हता. मात्र, या प्रकारामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली.