जरांगे पाटलांवर बोलू नका! एकनाथ शिंदेंची रामदास कदमांना सूचना? । Kokanshahi ।

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या देवाण-घेवाणाची ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुतीमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
त्यातच, शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांचा फोटो दाखवत ही मैत्री असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, भाजपाकडून मित्रपक्षाला दाबलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, भाजप नेतेही नाराज झाले आहेत. आता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रामदास कदमांना न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. मंत्री उदय सामंत यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना या विषयावर आणखी भाष्य न करण्याची स्पष्ट सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. या विषयावर आता बोलणं थांबवा, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला पूर्णविराम देण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांवर आता काय पडदा पडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रामदास कदम पक्षात एकटे पडले?

मनोज जरांगे पाटलांच्या क्लिपवरील टीकेनंतर शिवसेना नेते रामदास कदम भाजपच्या निशाण्यावर असताना, पक्षातील नेते मात्र त्यांच्या पाठीशी नाहीत, अशी परिस्थिती दिसून येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी टिका केल्यानंतर मंत्री उदय सामंत सोडले तर शिवसेनेतून एकाही नेत्याने भाजप आमदारांना प्रतिउत्तर केले नाही. विशेष म्हणजे, रामदास कदमांनी मोदींना पत्र लिहिलं असून मित्र पक्षाकडून होत असलेल्या कटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर, पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या क्लिपच्या चौकशीची मागणी केली. मात्र, कदमांवर होत असलेल्या भाजप आमदारांच्या टिकेला कोणीही उत्तर देत नाही. त्यातून भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम पक्षातच एकटे पडल्याचे चित्र स्पष्ट आहे. तर, शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय हा फक्त नावापूरता असून मूळात युतीच्या नेत्यांमध्येत मान-अपमानाची लढाई असल्याचे नेते खासगीत बोलतात. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे नेत्यांकडून सांगितले जाते.