नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याचे व्यापाऱ्याकडे अडकलेले तब्बल २५ लाख रुपये अखेर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मंत्री नितेश राणे यांनी थेट संबंधित व्यापाऱ्याला फोन करत शेतकऱ्याची देणी तातडीने देण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
निफाड परिसरातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा कांदा मुंबईमध्ये विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, कांदा विक्री होऊनही शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकून पडले होते. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून शेतकरी वारंवार फोन करून आपल्या पैशांची मागणी करत होते. मात्र, व्यापाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पैशांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता.
वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. अखेर हा प्रकार मंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आला. मंत्री नितेश राणे हे अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांना शेतकऱ्यांची व्यथा समजली.
यानंतर मंत्री नितेश राणे यांनी विलंब न करता संबंधित व्यापाऱ्याला थेट फोन केला आणि शेतकऱ्याची थकीत देणी तातडीने देण्याच्या सूचना दिल्या. मंत्री नितेश राणे यांच्या फोननंतर व्यापाऱ्याने पैसे देण्याची तयारी दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे शेतीमालाचे पैसे अडकून पडल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला या घडामोडींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी थेट हस्तक्षेप केल्याने मंत्री नितेश राणे यांची ही कृती चर्चेचा विषय ठरत आहे.









