श्री. आकाश तांबे यांचे मार्गदर्शन: डॉ. आंबेडकरांचे विचार आजही तितकेच प्रभावी

वाडा हायस्कूलमध्ये डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

(वाडा) येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूल येथे मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती प्रशालेच्या तात्या भिडे सभागृहात सकाळी ८.१५ वाजता साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्रशालेचे सहा.शिक्षक श्री.आकाश तांबे होते. सोबतच व्यासपीठावर शाळा समितीचे अध्यक्ष श्री.हर्षद जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री.सिद्राम पाटील, श्री.मिलिंद लेले व श्री.सचिन मोरे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर इयत्ता ९ वी अ च्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली. यामध्ये कु.स्वरा जाधव, कु.आदेश पुजारे, कु.चैतन्य तांबे, कु.आर्या रेवंडेकर, कु.नीरज पुजारे यांनी सहभाग नोंदवला. कु.मधुरा भाबल हिने डॉ.आंबेडकर यांच्यावर गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष श्री.हर्षद जोशी यांनी डॉ.आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य विशद करून विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले तर श्री.आकाश तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ.आंबेडकरांचे विचार वैश्विक असून प्रांत, भाषा, जाती धर्माच्या पलीकडे त्यांचे कार्य आहे असे प्रतिपादन केले. श्री.सचिन मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी इयत्ता नववीच्या कु.हर्ष वाडेकर याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या काढलेल्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समिधा मराठे तर आभार प्रदर्शन कु.अनुष्का गुरव हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववी अ च्या वर्गाने केले होते. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.