गोंधयाळे गावच्या किड्यांच्या त्रासाची अखेर प्रशासनाने घेतली दखल

नेरूर गोंधयाळे येथील MSWC / FCI धान्य गोदामामुळे गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील घरांमध्ये होत असलेल्या किड्यांच्या भयंकर उपद्रवाची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे.याबाबत जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी दि. 08/06/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीला प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांनीही अहवालाद्वारे दुजोरा दिला होता.

गोदामातील कीड घरात शिरून नागरिकांना झोप न लागणे, त्वचेला खाज, ॲलर्जीचा खोकला व अन्नात कीडे पडण्याचे प्रकार घडत होते.या सर्व तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), सिंधुदुर्ग चे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. विजय सहारे यांनी दि. 22/10/2026 रोजी पत्र क्र. जिपुअ सिंधु/कार्या-०१/गोंधयाळे/२०२६ अन्वये भारतीय अन्न महामंडळ, पनवेल यांच्या विभागीय व्यवस्थापकांना कठोर आदेश दिले आहेत.पत्रात म्हटले आहे की -“FCI गोदाम व त्या ठिकाणी साठवणूक होणारे धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित FCI अधिकारी यांची आहे. त्यामुळे सदर विषयाबाबत योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.”गेल्या वेळी साठा अधीक्षक कुडाळ यांनी “पावसाळ्यापूर्वी फवारणी केली जाते” असे सांगून वेळ मारून नेली होती, परंतु प्रत्यक्षात कीड कायम होती. आता थेट जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीच आदेश दिल्याने FCI ला तातडीने धुरीकरण व कीटकनाशक फवारणी करावी लागणार आहे.रुपेश पावसकर म्हणाले, “हा गोंधयाळे ग्रामस्थांच्या लढ्याचा पहिला विजय आहे. प्रशासनाने आमचे म्हणणे मान्य केले आहे. आता FCI ने ७ दिवसात कार्यवाही न केल्यास आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपोषण करू. हा आरोग्याचा प्रश्न आहे, यात तडजोड नाही.”