कणकवली : कणकवलीत नरकासुर स्पर्धेचा थरार रंगणार असून, स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
कणकवली येथील बळणगोपाळ व टेंबवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने येत्या ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गणपती साना येथे भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ६ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून, कणकवली परिसरातील नागरिकांनाही नरकासुर स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आयोजक नयन यादव, प्रथमेश परब, ओंकार सुतार आणि सोमनाथ पारगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या या नरकासुर स्पर्धेत कोण बाजी मारणार आणि आकर्षक बक्षिसांवर कोण आपले नाव कोरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












