नारुरमध्ये निसर्गाचा प्रकोप! भक्त निवासाचे छप्पर उडाले, शेतकऱ्यांवर संकट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यातील नारुर गावाला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून, महालक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या धर्मशाळेच्या अर्थात भक्त निवासाचे छप्पर उडाले आहे. तर दुसरीकडे, कापणीसाठी तयार असलेली भातशेती भुईसपाट झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

कुडाळ तालुक्यातील नारुर गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवनावर परिणाम झाला.

वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, नारुर येथील महालक्ष्मी मंदिरानजीक असलेल्या धर्मशाळेच्या अर्थात भक्त निवासाच्या इमारतीचे छप्पर भिंतीपासून निखळून एका बाजूला उडून गेले. या दुर्घटनेत इमारतीतील पंखे, विद्युत व्यवस्था आणि छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, या वादळी पावसाचा फटका परिसरातील नागरिकांनाही बसला. सुरेश पारकर यांच्या घरावर सुपारीचे झाड कोसळल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले. तसेच सुरेश भागवत यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

एकीकडे घरांचे आणि इमारतींचे नुकसान झाले असताना, दुसरीकडे बळीराजावरही अस्मानी संकट कोसळले आहे. नारुर परिसरात अनेक ठिकाणी भातपीक कापणीसाठी तयार झाले होते. मात्र, अचानक आलेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने उभे भातपीक जमिनीवर आडवे केले.

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापून ठेवलेली भातशेती पावसात भिजली आहे. त्यामुळे भातपिकाच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वर्षभर मेहनत करून पिकवलेले धान्य ऐन कापणीच्या वेळी संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

प्रशासनाकडून पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी!

या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या घरांची, इमारतींची आणि भातशेतीची प्रशासनाने तातडीने पाहणी करावी. नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

आता प्रशासन या नुकसानीची किती तत्परतेने दखल घेते आणि बाधितांना मदत कधी मिळते, याकडे नारुरवासीयांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

परतीच्या पावसाने नारुर गावात घरांचे नुकसान करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकालाही मोठा फटका दिला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे.