जिल्हा नियोजनची सभा गाजली ; ते “रेफर” प्रकरण आलं समोर ; पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले स्पष्ट निर्देश

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत एका गंभीर रेफर प्रकरणावर जोरदार चर्चा होऊन वातावरण तापले. ट्युमर असलेल्या एका महिलेला “हाय रिस्क प्रेग्नंसी” म्हणून जिल्ह्याबाहेर रेफर करण्यात आल्याच्या प्रकारावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना फैलावर घेत थेट जाब विचारला.

संबंधित महिलेला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून योग्य उपचार न देता तातडीने रेफर करण्यात आल्याने रुग्णाच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला. “आपण आमच्या जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळत आहात. हे खपवून घेतले जाणार नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.

जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, मग आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध नसतील तर निधी आणायचा कशासाठी, असा थेट सवालही पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील रुग्णांना किरकोळ कारणांसाठी बाहेर रेफर करण्याची सवय वाढत असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही, तसेच रुग्णांना जिल्ह्यातच योग्य व वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत उपस्थित सदस्यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी केली. या रेफर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.