पालघर शिरगाव : प्रतिनिधी
कोकण किनाऱ्यावर यंदा सांस्कृतिक इतिहास घडणार असून १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिरगाव बीच येथे आयोजित १२ वा ग्लोबल कोकण महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज झाला आहे. यावर्षी प्रथमच समुद्रकिनाऱ्यावर मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत असून मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक मान्यवर कलाकार या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे रायगडचे सुपुत्र आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मनोज जोशी यांची विशेष उपस्थिती. त्यांच्या सहभागामुळे महोत्सवाची प्रतिष्ठा आणि उत्साह अधिक वाढणार असल्याची प्रतिक्रिया आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली.
महोत्सवात १५० कलाकारांसह सादर होणारे ‘राजा रयतेचा’ महानाट्य, कोकणातील पारंपरिक लोककला सादरीकरणे, पॅरा मोटरिंग अॅडव्हेंचर, तसेच ५०० उद्योजकांचे भव्य संमेलन अशी विविध आकर्षणे असणार आहेत. पर्यटन, संस्कृती आणि उद्योग यांचा संगम घडवणारा हा सोहळा कोकणातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा बीच फेस्टिव्हल ठरणार आहे.
या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पार पडली असून प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नेतृत्वाने सक्रिय सहभाग नोंदवला.
“या आणि अनुभव घ्या — ग्लोबल कोकण महोत्सव!” असे आवाहन आयोजकांनी राज्यभरातील नागरिकांना केले आहे.












