कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत स.का. पाटील विद्यामंदिर केळूसमधील गुणवंत ,होतकरू व गरजूnविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली. या शिष्यवृत्तीचे लाभार्थी हर्ष राजन केळुसकर, भिकाजी प्रशांत राऊळ, दशरथ संदेश सर्वेकर, आर्या गोविंद गावडे हे आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून त्यांचे शिक्षणातील सातत्य टिकविण्यासाठी हातभार लागला आहे. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश खोत सर यांनी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी संस्थेचे आभार मानले . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा देणारी ज्ञानज्योती आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. संस्था पालक व शिक्षकांनीदेखील या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व आभार मानले . विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन उज्वल यश संपादन करण्याचा निर्धार केला आहे.ग्लोबल फाउंडेशन कडून गेली कित्येक वर्षे शिष्यवृत्ती प्रदान करणे, तसेच मुलांसाठी शैक्षणिक कार्यशाळांचे आयोजन , कोरानाकाळामध्ये गरजूंना धान्य वाटप तसेच केळूस हायस्कूलला मुलांसाठी शौचालय बांधून देण्यात आलेले आहे .












