भराडी देवी जत्रोत्सवात RTO कडून रस्ता सुरक्षेचा अनोखा उपक्रम

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. जत्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष चित्ररथ आणि एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती. या माध्यमातून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावणे, वेगमर्यादा पाळणे तसेच मद्यपान करून वाहन न चालवण्याचे महत्त्व भाविकांना समजावून सांगण्यात आले. याशिवाय सुरक्षित वाहनचालनेसंदर्भातील माहितीपत्रिकांचे वाटप करून नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी उपस्थित भाविकांना संबोधित करत रस्ता अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहनचालना हीच अपघातमुक्त प्रवासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे तसेच मोटार वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळे, संकेत सोमणाचे, अमित पाटील आणि अमित नायकवाडी उपस्थित होते. तसेच चालक लहू वाळके, सचिन सावंत आणि रामदास पाखरे यांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य केले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या या उपक्रमामुळे जत्रोत्सवासाठी आलेल्या भाविकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाली असून सुरक्षित प्रवासाचा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचविण्यास मदत झाली आहे.