कुडाळ : लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान किती महत्त्वाचे आहे, याचे प्रेरणादायी उदाहरण कुडाळ तालुक्यातील तेंडोली–आदोसेवाडी येथील अंजली राऊळ यांनी समाजासमोर ठेवले आहे. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या लग्नाच्या दिवशीही त्यांनी मतदानाला प्राधान्य देत ‘आधी मतदान, मग लग्न’ हा संदेश कृतीतून दिला.
लग्नाची धावपळ, नटण्या-थटण्याची तयारी आणि पाहुण्यांची वर्दळ असतानाही अंजली राऊळ यांनी वेळ काढत मतदान केंद्र क्रमांक २७० येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे तरुण पिढीला तसेच इतर मतदारांना मतदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे हे एका सजग व जबाबदार नागरिकाचे लक्षण असून अंजली राऊळ यांनी ते प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. त्यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून अनेकांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.
अंजली राऊळ यांच्या या जबाबदार आणि आदर्श कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.












