माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे ‘मी लाभार्थी’ म्हणून अर्ज करण्यास इच्छुक – रत्नाकर जोशी

माजी आमदार वैभव नाईक महायुतीकडे “मी लाभार्थी” अर्ज दाखल करण्यास इच्छुक! तन आघाडीत आणि मन महायुतीत असलेल्या नाईकांना म्हणूनच कणकवलीची बैठक महायुतीची की समर्थकांची याची काळजी! – रत्नाकर जोशी, शिवसेना जिल्हा प्रवक्ता

आज संपूर्ण उबाठाची झालेली अवस्था महाराष्ट्रासमोर आहे, त्यापेक्षा वेगळी काही माजी आमदार वैभव नाईकांची असेल असे वाटत नाही. स्वतःच्या आत्मचिंतनासाठी सतरंजी पसरली तर ती नेमकी कुठे पसरावी, भाजपात की शिंदेसेनेत याचा प्रश्न त्यांना पडला असणे साहजिक आहे.

महायुतीतल्या मतभेदांचा फायदा मालवण कणकवलीत उबाठाला झाला आणि एकही उमेदवार निवडून येण्याची संधी नसताना तिथे उबाठाचे काही नगरसेवक निवडून आले. पण रोज रोज दिवाळी नसते हे वैभव नाईकांनी समजून जावे. शिंक्याचे तुटणार आणि आपले फावणार या राजकीय गणितात असणाऱ्या अनेक बोक्यांची यामुळे सध्या पंचाईत झाली आहे. म्हणूनच कणकवलीची बैठक भाजपाची की महायुतीची याची काळजी त्यांना पडली आहे. ही बैठक कसली आहे हे महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते ठरवतील. वैभव नाईक यांनी बैठकीच्या हॉलचा मागचा दरवाजा टेहाळण्याची काहीही गरज नाही.

खासदार नारायण राणे साहेब हे राजकीय अर्थाने भाजपाचे खासदार असले तरीही संपूर्ण कोकणचे ते अनभिषिक्त नेते आहेत. त्यामुळे कोकणातील महायुतीतील सर्व पक्ष आणि त्यातील नेते हे खऱ्या अर्थाने राणेसमर्थकच आहेत आणि याचा प्रत्येकालाच अभिमान आहे. वैभव नाईक यांनी महायुती की समर्थक याकडे पाहण्यात आपला वेळ वाया न घालवता आपल्या उबाठा पक्षाला पंचायत समिती सोड, निदान जिल्हा परिषदेचे तरी पन्नास उमेदवार मिळतात का ते शोधण्यात आपला वेळ कामी लावावा. सध्या तरी त्याना महायुती किंवा समर्थक यापैकी कुठूनही “मी लाभार्थी” योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता नाही.