चाकू हल्ला प्रकरणी नेपाळी युवकाला पोलीस कोठडी

कणकवली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन नेपाळी युवकांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकाने दुसºयाच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला केल्याने नेपाळी कामगार लोकेश बिष्ट (२२, सध्या रा. कणकवली, मूळ रा. नेपाळ) हा तरुण गंभीर जखमी झाला. दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपी सुनील इंदर परिवार (२७, सध्या रा. कणकवली, मूळ नेपाळ) याला एलसीबीच्या पथकाने २४ तासांत ताब्यात घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी कबीर लालसिंग बोहरा याने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकेश हा आपल्या रुममध्ये असताना त्याला छोटू नावाच्या मित्राचा फोन आला. छोटूने त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्यास सांगितले. त्यामुळे लोकेश हा त्याठिकाणी गेला. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती छोटूसोबत होती. लोकेश आल्यावर त्या अनोळखी व्यक्तीने छोटूला जाण्यास सांगितले.

त्यानंतर त्या अनोळखी व्यक्ती व लोकेश यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्या अनोळखी व्यक्तीने लोकेशला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्या व्यक्तीने हातात असलेल्या चाकूने लोकेश याच्या डोक्यावर मारला, यात लोकेश गंभीर जखमी झाला होता. ही अनोळखी व्यक्ती म्हणजे सुनील परिवार असल्याचे निष्पन्न झाले.

अंधाराचा फायदा घेत झाला होता. ही घटना समजताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे आणि सहायक पोलीस निरीक्षक नागेश चिकने यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच हल्ला करणारा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता, जखमी लोकेश बिष्ट याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. कोकणशाही कणकवली