उद्या दुपारी १२ वाजता बंधू ठाकरेंची युती घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांतील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जागावाटप अद्याप अंतिम झाले नसले तरी बुधवारी दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज याबाबत माहिती दिली

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुंची युती झालेलीच आहे. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली असून कोणताही संभ्रम नाही. फक्त घोषणा करायचा विषय आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्त्यांकडून सोबत काम करायला सुरुवात झाली आहे, तशा सूचना दिल्या आहेत. युती झाली आहे, फक्त जागावाटवपाबाबत काल रात्री शेवटची भेट झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन घोषणा करतील. नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे, असेही राऊत यांनी सांगितले. कोकणशाही मुंबई