स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापोली शहरातील रूपनगर कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची दोन मुले शाळेत गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली.अविनाश शिर्के (४०) आणि अश्विनी शिर्के (३५) असे जखमी दाम्पत्याची नावे आहेत.
शहरातील रूपनगर कॉम्प्लेक्समध्ये शिर्के कुटुंब राहत आहे. शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमाराला घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयानक होता की, काही कळायच्या आत घरातील साहित्याचं नुकसान झाले
या स्फोटामुळे शिर्के यांच्या खोलीचा मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूची भिंत शेजारील माने यांच्या दरवाजावर पडली. शेजारी राहणाऱ्या जाधव यांच्या घरालाही या स्फोटाचे हादरे बसले. तसेच घराच्या खिडकीवरील ग्रील निखळून खाली पडले. त्यामुळे सदनिकेच्या खाली उभ्या असणाऱ्या चारचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.










