फार्म कंपनी विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन ;खैरे येथील ६० जणांवर गुन्हा दाखल..


महाड एमआयडीसीतील सवाणे ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गावाशेजारी सुदर्शन फार्मा कंपनीचे काम चालू आहे. मागील वर्षापासून कामाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे. एक वर्षानंतर पुन्हा शुक्रवारपासून पोलीस बंदोबस्तामध्ये कामाला सुरुवात केली आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवरच तीव्र आंदोलन छेडून काम बंद पाडले. त्याचबरोबर जेसीबी ऑपरेटरने अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत जेसीबी मालक निसार दरेखान यांना मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

सुदर्शन फार्मा कंपनीच्या कामाविरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी जेसीबी मालकाच्या गाडीचे नुकसान करून त्यांना धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी ५० ते ६० महिला आणि पुरूषांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निसार दरेखान यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, पोलिसांची आणि ग्रामस्थांची शाब्दिक बाचाबाची देखील झाली होती. ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन आणि आक्रोश पाहिल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली होती. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड अधिक तपास करीत आहे.