महावितरण अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार! वीजेचा खांब थेट चक्क मांगराच्या छप्परावर

बांदा : रोणापाल-देऊळवाडी परिसरात मुसळधार पावसात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वीजेचा खांब कोसळून थेट मांगरावर पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मांगराच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणी केलेले भात भिजल्यामुळे पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.
ठेकेदाराच्या दर्जाहीन कामामुळे आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा गंभीर आरोप रोणापालचे माजी सरपंच उदय देऊलकर यांनी केला आहे. रोणापाल परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. याच दरम्यान रोणापाल-देऊळवाडी येथील देऊलकर कुटुंबीयांच्या घरासमोरील वीजेचा खांब कोसळला आणि तो थेट मांगरावर पडला. यामुळे मांगराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे मांगरात कापणी करून ठेवलेले भात या पावसात पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी बांदा सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर यांना जाब विचारला. हा वीजेचा पोल योग्य प्रमाणात जमिनीत पुरलेला नव्हता, ही बाब या दुर्घटनेचे मूळ कारण आहे. याबाबत माजी सरपंच उदय देऊलकर यांनी संबंधित ठेकेदाराला आधीच कल्पना दिली होती. मात्र ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केला आहे.
वीज पोल कोसळल्यानंतर तातडीने वीज पुरवठा बंद करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करूनही त्यांनी फोन रिसिव्ह केले नसल्याचे उदय देऊलकर यांनी सांगितले. अशावेळी मोठी दुर्घटना झाली असती, तर त्याची जबाबदारी कुणाची?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचा निष्काळजीपणा वारंवार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेमुळे रोणापाल परिसरात महावितरणच्या कामाच्या दर्जावर आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकणशाही बांदा