रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील आंबा बागेतील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना सकाळी घडली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे हा बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे

सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी आंबा बागेतील कठडा असलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली. तत्काळ ही माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना देऊन रेस्क्यू टीमसह पिंजरा आणि आवश्यक साहित्य घटनास्थळी पोहोचविण्यात आले. ही विहीर अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेत असून ती आयताकृती आणि कच्च्या कठड्याची आहे. विहिरीची लांबी अंदाजे 15 फूट, रुंदी 10 फूट आणि खोली 25 फूट आहे. पाण्याची पातळी सुमारे 7 ते 8 फूट असून, बिबट्या विहिरीतील दगडावर बसलेला आढळून आला.
त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी प्रथम विहिरीभोवती जाळी टाकून परिसर सुरक्षित केला. पिंजरा दोऱ्यांच्या साहाय्याने विहिरीत सोडला. अवघ्या 15 मिनिटांत बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकवण्यात यश आले. मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. हा बिबट्या हा नर असून त्याचे वय सुमारे 6 ते 7 वर्षे आहे. प्राथमिक अंदाजानुसार भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडल्याचे समजते.

ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम विभागीय वनाधिकारी रत्नागिरी-चिपळूण गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक सौ. प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कार्यात परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे (पाली), सारीक फकीर (लांजा), वनरक्षक विराज संसारे (रत्नागिरी), शर्वरी कदम (जाकादेवी), तसेच प्राणिमित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, पोलिस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, गावचे सरपंच फैय्याज मुकादम, तंटामुक्ती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर आणि ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोकणशाही रत्नागिरी