मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात कुंभारवाडा या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना अंडरपास मार्ग मिळावा, अशी मागणी रहिवासी शशांक भाई शेट्ये व अन्य ग्रामस्थांनी केली आहे .
सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने लांजा शहरात वेग घेतला आहे. लांजा शहरात कुंभारवाडी, डफळेवाडी, पुरातवाडी, धुंदरे आदर्श नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून या ठिकाणी महामार्गावर ८०० मीटर ची भिंत असल्याने उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी येथील रहिवाशांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. या ठिकाणी अंडरपास मार्ग नसल्यास या ठिकाणी रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक रहिवाशांची महामार्ग ओलांडण्याबाबत होणारी गैरसोय लक्षात घेता या ठिकाणी पाच मीटरचा अंडरपास मार्ग मिळावा.
जेणेकरून डावीकडच्या लोकांना उजवीकडे आणि उजवीकडील लोकांना डावीकडे ये जा करण्यास अडचणीचे होणार नाही
स्थानिक रहिवाशांची ही रास्त मागणी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी पाच मीटरचा अंडरपास मार्ग मंजूर करून त्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.










