लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेत पोबारा केला. पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर (वय ८१, रा. नापणे धनगरवाडा) असे या वृद्धाचे नाव असून रेकी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी स. ७.३० च्या सुमारास नापणे – धनगरवाडा येथे घडली.पुरुषोत्तम प्रभूलकर यांचे मूळ गाव भुईबावडा असून नापणे- धनगरवाडा येथे वरहल्लेखोर चोरटा सोमवारी प्रभूलकर यांच्या घरात आला होता. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले होते. त्याला प्रभूलकर यांच्या पत्नीने पाणी दिले होते. पाणी पिऊन तो निघून गेला होता. मंगळवारी हल्ला करणारा हा तोच असल्याचे प्रभूलकर दाम्पत्याने ओळखले आहे. त्याला दाढी असून तो काळासावळा आहे. यावरून त्याने घर व परिसराची रेकी केल्याचा अंदाज आहे. मंगळवारी स. ७.३० वा. च्या सुमारास ते घराच्या पाठीमागे गेले होते. यावेळी मागून येऊन अज्ञाताने परशुराम यांच्या डोक्यात लाकडी बांबूने जोरदार प्रहार केला. आणि त्यांच्या गळयातील १५ ग्रॅमची सुमारे ७५ हजारांची सोन्याची चेन खेचून घेतली. बोटातील सोन्याची अंगठी हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अंगठी त्याचा हातात आली नाही. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताचे अनामिका बोट, तर्जणी तुटली.मात्रआरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी बाहेर आली. तिनेही आरडाओरडा केल्यामुळे चोरटा पळाला. जखमी प्रभूलकर यांना ग्रामस्थांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना कणकवली येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडीचे सहा. पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सपोनि माधुरी आडुळकर, उद्धव साबळे, हरिश्चंद्र जायभाय, अभिजित तावडे यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अति. अधीक्षक कृषीकेश रावले यांनी घटनेची माहिती घेत तपासाच्या सूचना पोलिसांना केल्या.










