चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली आहे. य़ा दरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.शहरातील वाढत्या तापमानामुळे आज आणि उद्या मुंबईत हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच “मराठवाडा आणि आसपासच्या भागात खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार अभिसरण आहे.” त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडू शकतो, तर ठाणे सारख्या जवळच्या भागात अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले आहे.आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने हलक्या ते मध्यम पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे.










