रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक…

रायगड प्रतिनिधी

उन्‍हाच्‍या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. त्‍याचा परीणाम धरणांतील पाणी साठ्यावर होता दिसतो आहे. पाटबंधारे विभागाच्‍या अखत्‍यारीत येणाऱ्या रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. २८ धरणांमध्‍ये ४३.९९ टक्‍के इतकाच पाणीसाठा असल्‍याची माहिती समोर आली आहे. या पाण्‍यावर पुढील अडीच महिने कसे काढायचे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला. धरणे शंभर टक्के भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु, मार्च महिना संपत असताना धरणामधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २८ धरणांत आता केवळ जवळपास ४० टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा पुरवण्यासाठी नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.