रत्नागिरी:
गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-खांबडवाडी येथे काल (बुधवारी ता. 26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर (वय 29, रा. उंबरवाडी, नाखरे) असे मृत तरुणाचं नाव आहे.या भीषण घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा दुचाकीने पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी जात असताना ही दुर्घटना घडली आहे. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकी (एमएच 08 बीजी 2916)ची अनिकेत अविनाश खाके (वय 28) याच्या कारसोबत (एमएच 47 एबी 2194) समोरासमोर धडक झाली. या अपघातात चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर चंद्रवदनचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. माहिती मिळताच चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकरचे नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या अपघातामुळे पावस-नाखरे रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अष्टपैलू व्यक्तिमत्त्व चंद्रवदन बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा तरुण होता. त्याला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यावसायिक म्हणूनही ओळखला जात होता. त्याने वकिलीचे शिक्षणही घेतले होते. महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते. चंद्रवदनचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. नेहमी हसतमुख असणारा आंबा बागायतदार चंद्रवदन याच्या अपघाती जाण्याने अनेकांना धक्का बसला..










