सावंतवाडी :
कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. त्यामुळेच पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचे जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे. साहित्याचा ठेवा असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये येणाऱ्या वर्षभरात अामुलाग्र बदल करण्यात येणार असून काळानुरूप त्यांचे आधुनिकीकरण देखील करण्यात येणार आहे. मोबाईलच्या अधीन झालेली व पुस्तकांपासून व साहित्यापासून दूर जात असलेली नवी पिढी पुन्हा एकदा ग्रंथालयाकडे वळवण्यासाठीदेखील आपण पुढाकार घेतला असून त्यासाठी डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आपण पुढे आणत आहे. त्या दृष्टीने आपण आराखडा व नियोजन केलेले असून संबंधित मंत्र्यांशी बोलून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या व आवश्यक निधी आपण लवकरच उपलब्ध करणार आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात जिल्ह्यातील ग्रंथालयांची परिस्थिती निश्चितच बदललेली दिसेल, अशी ग्वाही कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.










