भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भूमिका | साईची चावडी | अपेक्षांची पंचवीशी

kokanshahi |✍️

(साईनाथ गांवकर/ मुख्य संपादक- कोकणशाही 9405466770)

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यायाने कोकणच्या विकासाची संकल्पना मांडणारे सरपंच परिषद, नगरसेवक परिषद, उद्योजक मेळावे, बहुचर्चित जाबसाल, व्हिजन सिंधुदुर्ग २०३०, आरसा कोकणाचा यांसारखे एक ना अनेक उपक्रम कोकणशाहीने अगदी सुरुवातीपासूनच हाती घेतलेत. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे साईची चावडी! या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यायाने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अपेक्षांची मालिका आपण या २०२५ च्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरु केली आहे. ‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि त्याबाबत आम्हा माध्यमांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे?’ या विषयावर आज घेऊन आलोय कोकणशाही प्रस्तुत साईंची चावडी. आज सिंधुदुर्गात नेमंक काय घडतयं? प्रशासन चुकतंय की राजकारण भरकटतय? याचे उत्तर शोधण्यापेक्षा आम्ही माध्यम म्हणून सिंधुदुर्गच्या विकासाच्या प्रक्रियेत जबाबदारीचे ‘भान’ शोधण्याची गरज आहे, असं माझ अगदी सुरुवातीलाच स्पष्ट मत आहे. सकारात्मक बातम्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी माध्यमांनी आपली एनर्जी खर्च करावी असं माझं अजून एक स्पष्ट मत आहे. त्यासाठीच भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वरूप आणि त्यात माध्यमांची भूमिका याबाबत विचार करताना जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागतील. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे, जो आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे नामदार नितेश नारायणराव राणे यांच्या हातात असल्याने आता सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. पूर्वी मनिऑर्डरवर चालणार सिंधुदुर्ग विद्यमान खा. नारायण राणे यांच्या एंट्री नंतर स्वयंपूर्ण झाला हे एका बाजूला सूर्यप्रकाशाएवढं सत्य असतानाच आजच्या घडीला सिंधुदुर्गमधील प्रत्येक घरातील एक व्यक्ती मुंबई, पुणे यांसारख्या शहराच्या ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित झालाय. दसरा, दिवाळी, होळी, गणपती सण – उत्सवापुरती उघडली जाणारी बंद दरांची कुलुपे कायमची उघडण्यासाठी या सर्वाना पुन्हा सिंधुदुर्गात आणावे लागेल. मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी ज्या कंपन्यांनमध्ये इकडचे तरुण तरुणी काम करत आहेत त्या कंपन्या सिंधुदुर्गातच झाल्या तर इथल्या तरुणाइच्या हाती इथेच रोजगार मिळू शकेल. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निसर्गसंपन्नता जपत औद्योगिक प्रकल्प, आयटी पार्क या जिल्ह्यात येणं ही या सिंधुदुर्गची गरज आहे. खरं तर असे प्रकल्प येत असताना विकासाची एलर्जी असणारे राजकीय मंडळी आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. या विकास विरोधी पिलावळीचे खोटे मुखवटे फाडण्याची आणि सर्वसामान्य जनतेसमोर सत्य दाखवण्याची जबाबदारी आम्हा माध्यमांची आहे. मी नेहमी सांगतो, आम्ही माध्यम म्हणून जे आम्हाला दाखवायचं आहे तेच तुम्ही पाहणार. त्यामुळे आम्ही तुमच्यासमोर नेमकं काय दाखवलं पाहिजे या जबाबदारीचे ‘भान’ आम्हा माध्यमांना असलेच पाहिजे. कोकणशाही म्हणून आम्ही हे जबाबदारीचे भान वेळोवेळी जपले आहे. मग सत्य सांगत असताना भले कितीही टीका होवो पण आमच्या लेखनीमध्ये तसूभरही कधी फरक पडला नाही आणि याहीपुढे पडणार नाही, हे ठामपणे सांगतो. भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्हा या विषयाचा पाठलाग करत असताना पहिला मुद्दा आपण सर्वानी ध्यानात घेतला पाहिजे तो म्हणजे पर्यटनाचा विकासाचा. सिंधुदुर्गात मालवण, तारकर्ली, देवगड आणि विजयदुर्गसारखी पर्यटनस्थळे आहेत. भविष्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी रस्ते, हॉटेल्स, परिवहन यांसारख्या पायाभूत सुविधा सुधारणे आवश्यक आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे पूर्ण होणे ही सिंधुदुर्गच्या पर्यटन वाढीची गरज आहे. चिपीच्या विमानतळावरून नियमित विमानांचे उड्डाण होणे आणि चिपी विमानतळाचा विस्तार होणे ही काळाची गरज आहे. आम्ही माध्यम म्हणून राजकीय बातम्या आणि गुन्हेगारीच्या बातम्या याहीपलीकडे सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासाच्या बातम्यांकडे आकर्षित झालं पाहिजे. पर्यटन व्यावसायिकांच्या परवानग्या सहित सर्व समस्या मांडण्यासाठी आम्ही माध्यम म्हणून सातत्याने मंच उपलब्ध करून दिलाच पाहिजे. त्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. माध्यम म्हणून याच भूमिकेतून लेखनी लिहिली गेली तर भविष्यातील सुवर्ण सिंधुदुर्ग दूर नाही. विकास म्हणून भविष्याकडे पाहताना दुसरा मुद्दा महत्वाचा ठरतोय तो शाश्वत शेती आणि मत्स्यव्यवसाय. सिंधुदुर्गातील मुख्य व्यवसाय असलेली आंबा, काजू, नारळची शेती आणि मत्स्यव्यवसाय यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी जोडण्याची गरज आहे. भविष्यात हे क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी जलसंधारण आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर द्यावा लागेल. भविष्यातील सुजलाम सुफलाम सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासाचा चौथा महत्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण आणि तंत्रज्ञान. शिक्षणाचा दर्जा सुधारून आणि डिजिटल साक्षरता वाढवून तरुणांना सिंधुदुर्गातच नवीन संधी कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यामुळे स्थलांतर थांबून जिल्ह्याचा आर्थिक विकास साधता येईल. आज बंद पडत चाललेल्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीतील मुलांची कमी होणारी पटसंख्या पाहता मुळात शहरांच्या ठिकाणी होणारे स्थलांतर थांबवणे आवश्यक आहे. हे स्थलांतर थांबण्यासाठी सिंधुदुर्गात प्रकल्प येणे गरजेचे आहे. त्यातून आपोआप शैक्षणिक दर्जा देखील सुधारला जाईल असं माझं स्पष्ट मत आहे. आजही प्रत्येक वेळी गोवा बांबुळीत जाणारी रुग्णवाहिका जेव्हा सिंधुदुर्गातच स्थिरावेल आणि इथल्या लोकांना इथेच दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल तेव्हा भविष्यातील निरोगी आणि सुदृढ सिंधुदुर्गचे स्वप्न साकार झाले असे म्हणता येईल. भविष्यातील सिंधदुर्गचे सुंदरपण कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी पाचवा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण. पश्चिम घाट आणि समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण भविष्यातील सिंधुदुर्गसाठी महत्त्वाचे असेल. हवामान बदलामुळे होणारे नुकसान म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर समुद्र पातळी वाढणे.. यांसारखे धोके टाळण्यासाठी धोरणे आखावी लागतील. या सर्व अपेक्षा व्यक्त करत असतानाच आता यात सजग माध्यमांची भूमिका देखील महत्वाची आहे. माध्यमे ही समाज आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. सिंधुदुर्गच्या भविष्याच्या संदर्भात माध्यमांची भूमिका देखील सर्वात महत्वाची आहे. पर्यटन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. रस्ते, आरोग्य सुविधा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत समस्यांवर प्रकाश टाकून माध्यमांनी संधितांना जबाबदार धरले पाहिजे. मुंबई-गोवा महामार्गासारख्या रखडलेल्या प्रकल्पांवर सातत्याने चर्चा घडवून त्यांना गती देण्यासाठी दबाव निर्माण केला गेला पाहिजे. थेट प्रभावशाली घटक जे माध्यम सहजगत्या करु शकतात ते म्हणजे स्थानिक संस्कृती आणि व्यवसायांचा प्रचारासाठी माध्यमांची सुनियोजित वापर. मालवणी खाद्यपदार्थ, हस्तकला आणि स्थानिक उत्पादने (उदा. देवगड हापूस) यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी माध्यमे मार्केटिंगचे साधन बनू शकतात. डिजिटल माध्यमांद्वारे हे शक्य आहे. आणि यासाठी आवश्यत आहे ते म्हणजे माध्यमांनी केलेल्या “सकारात्मक बातम्यांचा प्रसार”…. सिंधुदुर्गातील नवीन संधी, यशोगाथा आणि विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवून माध्यमे आशावाद निर्माण करू शकतात. उदा. चिपी विमानतळ सुरू झाल्याने पर्यटनाला मिळालेली चालना यासारख्या बातम्या प्रेरणादायी ठरू शकतात. माध्यमांमध्ये यासाठी आजपासून सामाजिक बदलांचे प्रतिबिंब दिसण्याची गरज आहे. तरुणांचे स्थलांतर, पर्यावरणाचे प्रश्न आणि शिक्षणाचा अभाव यासारख्या मुद्द्यांवर चर्चा घडवून माध्यमे सामाजिक बदलाला दिशा देऊ शकतात. स्थानिक भाषेतील (मालवणी, मराठी) प्रसारमाध्यमे यात प्रभावी ठरतील. जिथे अधिकारी, नेते चुकतील तिकडे आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांच्या चुका दाखवणे आणि जिथे योग्य काम करतील तिथे त्यांचे कौतुक करणे हे काम माध्यमांनी केले पाहिजे. आम्ही कोकणशाही म्हणून यापूर्वी देखील सिंधुदुर्गवासियांची भावना बोलून दाखवली आहे. आज पुन्हा एकदा सांगतो. ज्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गबाबत प्रेम आहे त्यांची याठिकाणी राहावे, ज्यांना जिल्ह्याच्या विकासाबाबत काहीच पडलेलं नाही त्यांनी स्वतःची बदली स्वतः करून घ्यावी अन्यथा अशा काही कामचुकार अधिकाऱ्यांना सिंधुदुर्गमधून लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांनी घालवून द्यावं, ही लोकांची भावना आहे. भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन, शेती आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा जिल्हा बनू शकतो, पण यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्थानिक आणि माध्यमे यांच्यात समन्वय आवश्यक आहे. माध्यमांनी केवळ टीका किंवा बातम्या देण्यापलीकडे जाऊन सकारात्मक बदलांचे उत्प्रेरक म्हणून काम करावे. चला तर मग.. या डिजिटल युगात सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स यांचा प्रभावी वापर करून सिंधुदुर्गला एक शाश्वत आणि समृद्ध भविष्याकडे घेऊन जावुया. कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर याहीपुढे कुठल्या जनसमस्येवर आम्ही संवाद साधावा असे तुम्हाला वाटतेय? जरुरु कंमेट करा.. कारण तुमचे प्रश्न हीच उद्याची जनचळवळ बनू शकते.. सिंधुदुर्गाच्या प्रश्नांसह त्याचा पाठपुरावा आणि जनकल्याणकारी उत्तरांसाठी पहात रहा साईंची चावडी आणि अर्थातच कोकणशाही.. धन्यवाद!