व्हिडिओ पार्लरवर पोलिसांचा छापा चार मशीन जप्त : चौघांवर गुन्हा…

कुडाळ :

व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे पैसे स्वीकारून जुगार सुरू असलेल्या कुडाळ बस स्थानक समोरील ओम साई व्हिडिओ गेम पार्लरवर शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. गेम पार्लरच्या दोन मालकांसह एक कामगार व एक जुगार खेळणारा अशा चारजणांना ताब्यात घेतले. तसेच व्हिडिओ गेमच्या चार इलेक्ट्रिक मशीन जप्त केल्या. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक फ्रीडन बुथेलो यांनी दिली.व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे पैसे स्वीकारून बस स्थानकासमोरील ओम साई व्हिडिओ गेम पार्लर येथे जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी (सावंतवाडी) कांबळे यांच्या परवानगीने व कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे,सहा. पोलिस उपनिरीक्षक देवानंद माने, हवालदार सचिन गवस, फ्रीडन बुथेलो आदींच्या पथकाने या गेम पार्लरवर छापा टाकला. तेथील चार इलेक्ट्रिक मशीन्स जप्त केल्या. संशयित आत्माराम दत्ताराम सावंत (कोलगाव- सावंतवाडी) व दीपक चिंतामणी लोट यांच्या मालकीचा हा व्हिडिओ गेम पार्लर असून तेथे प्रवीण जयराम माळवे (३९, रा. कुडाळ- केळबाईवाडी ) हा मतदनीस आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळण्याचा सार्वजनिक ठिकाणी अड्डा ठेवून त्याठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे संजय भाऊ वालावलकर (६२, रा. देवली) याच्याकडून पैसे स्वीकारून जुगार खेळ खेळत असताना आढळला. त्यामुळे गेम पार्लर मालक आत्माराम सावंत व दीपक लोट या दोघांसह चार जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मंगेश शिंगाडे करीत आहेत.