दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण ;७ जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी

दुसऱ्याकडे कामाला गेल्याच्या रागातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील ठेकेदार रोशन डेगवेकर यांच्यासह ७ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची खबर लवकुश राजेलाल मंहतो (मूळ रा. बिहार ) यांनी दिली आहे. डेगवेकर यांच्यासह राजेश मोरे व मडगावकर आदी ७ जणांनी मिळून आपला भाऊ बुलेट महंतो याला काल बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. याबाबतची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, यातील खबरदार लवकुश याचा भाऊ बुलेट हा रोशन डेगवेकर यांच्याकडे कामाला होता. मात्र त्या ठिकाणी त्याने काम चुकवून अन्य व्यक्तीकडे कामाला गेल्याचा राग मनात ठेवून डेगवेकर यांच्यासह राजेश मोरे, मडगावकर आणि अन्य तीन ते चार लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी त्याचा भाऊ लवकुश यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली. त्यानुसार सात जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बावळाट येथे घडली होती. त्यातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत आपला भाऊ ठेकेदारडेगवेकर हे माझ्या भावाला आपले काम केले नाही तर मारेल असे बोलून पैशाचा हिशोब विचारत दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी व त्याच्या सहकार्यांनी आपल्या भावाला बेदम मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.