विधानसभा मतदारसंघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. जिल्हाप्रमुख पदाचा वापर जनतेच्या हितासाठी करणार आहे. त्याचबरोबर आ. दीपक केसरकर यांना अपेक्षित पक्षसंघटना बळकटीचे काम करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मुंबई येथे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संजू परब गुरुवारी सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परब म्हणाले, शिवसेना नेतृत्वाने दिलेली जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सार्थकी लावण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे. हे पद दिल्याबद्दल मी आ. दीपक केसरकर आणि माझे राजकीय गुरू आ. नीलेश राणे यांचे आभार मानतो. आ. केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहराचा विकास झाला आहे. त्याचबरोबर या आधीच्या काळात आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील संत गाडगेबाबा भाजी मंडई, जनरल जगन्नाथ राव भोसले शिव उद्यान आदी अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. सावंतवाडी शहरातील प्रस्तावीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. हा प्रश्न जागेमुळे रखडला ही वस्तुस्थिती आहे. परंतु येणाऱ्या काळात हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जाणार आहेत असे ते म्हणाले.माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर, युवा सेनेचे प्रतीक बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, बंटी राजपुरोहित, महिला शहर संघटक भारती मोरे, सुहासिनी सौदागर, नंदू शिरोडकर, देव्या सूर्याजी, सुदन कवठणकर, विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.










