समुद्रात तब्बल ९५ दिवस अडकलेल्या मच्छीमाराची अखेर सुखरूप सुटका…

ब्युरो न्यूज कोकणशाही

देव तारी त्याला कोण मारी…’ असे म्हणतात ते खोटे नाही. कारण, याचे प्रत्यंतर नुकतेच पेरू देशामध्ये आले. समुद्रात ९५ दिवस अडकून पडलेल्या या देशातील एका मच्छीमाराची नुकतीच सुखरूप सुटका करण्यात आली. हा मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेला होता. त्यावेळी भयंकर वादळ सुरू झाले. या वादळात त्याच्या मासेमारी बोटीचे, तसेच बोटीवरील दळणवळण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचवेळी दुर्दैवाने त्याच्या बोटीचे इंजिनही बंद पडले. आपण नेमके कुठे आहोत, हेच त्याला समजत नव्हते. त्यामुळे तो समुद्रात भरकटला; पण अशाही परिस्थितीत त्याने जगण्याची आशा मात्र सोडली नव्हती. या काळात तो मासे, पक्षी यांचे मांस खाऊन व समुद्राचे पाणी पिऊन जगला. अखेर येथून निघालेल्या एका मोठ्या जहाजावरील चालक दलाच्या दृष्टीस तो पडला अन् त्याची यशस्वी सुटका करण्यात आली. तब्बल ९५ दिवसांनी किनाऱ्यावर सुखरूप परत आल्यानंतर त्याच्यासह त्याच्या नातलगांनी एकमेकांना आलिंगन देत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.