कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणचा सिंधुदुर्गपासून रत्नागिरी, रायगडपर्यंत उद्योगासह पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. सेमी कंडक्टर व हत्यारे बनवणारे पर्यावरणपूरक प्रकल्प येऊ घातले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रत्नागिरी येथे एमआयडीसी आणि टाटा टेक्नॉलॉजी संचालित कौशल्यवर्धन केंद्राच्या पायाभरणी समारंभा प्रसंगी ते बोलत होते. या ठिकाणी १९७ कोटी खर्च करून हे कौशल्यवर्धन केंद्र उभे राहत असून यात ३१ कोटी रुपये सरकार तर १६५ कोटी टाटाकडून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी कालानुरुप बदलत आहे. मिऱ्या-नागपूर हायवेमुळे अनेक चांगले परिणाम भविष्यात दिसून येतील, असे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे लवकरच विमाने उतरतील, त्यामुळे पर्यटनालाही फायदा मिळेल. उद्योजकही येतील त्याचा फायदा उद्योगधंदे वाढीसाठी होईल, असा विश्वासही अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा. तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कोकणात रेवस ते रेडी हा ग्रीनफिल्ड महामार्ग होणार आहे. यामुळे पर्यटनाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. परंतु, मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याची खंत अजितदादा पवार यांनी व्यक्त केली. हा महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या पूर्वी रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी होती. आता छत्रपती शिवेंद्रराजे यांच्यावर महामार्गाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.