शिमगोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज !

कणकवलीः

होळी रे होळी… पुरणाची पोळी, आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना… आकाशातून पडली किशी आणि…..ची जळली मिशी अशा आरोळ्या, हाकारे देत गुरुवार 13 मार्चपासून सिंधुदुर्गात शिमगोत्सवास प्रारंभ होत आहे. सकाळी होळी निमित्त पुरणपोळ्या आणि शेवया असा गोडधोड पदार्थांचा बेत तर सायंकाळच्या सत्रात गावागावात गावहोळ्या आणि वाडीवाडीत राखण होळ्या घातल्या जाणार आहेत. होळीपासून पुढील सात तर काही ठिकाणी पंधरा दिवस शिमगोत्सवाची ही धूम पाहायला मिळणार आहे. या शिमगोत्सवासाठी अवघा सिंधुदुर्ग सज्ज झाला आहे. तळ कोकणात शिमगोत्सवाच्या पहिल्या दिवशी वाजतगाजत भक्तीभावाने होळ्या उभारल्या जातात. त्यानंतर त्या होळीच्या ठिकाणी तसेच गावागावातील मांडाच्या घरामध्ये दिवाबत्ती लावून रात्री गोमूनृत्य, तमाशा अशा लोककला पाच, सात दिवस सादर केल्या जातात. या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले जाते. त्याचबरोबर घरोघरी जावून शबय, रोंबाट असेही परंपरेप्रमाणे कार्यक्रम होतात. परंपरेप्रमाणे अनेक गावांमध्ये देवाची पालखी घरोघरी जाते. गोडाधोडाचा नैवेद्य दाखून देवाची पूजा केली जाते व महिला ग्रामदेवतेची ओटी भरतात. धुळवडीनिमित्त ठिकठिकाणी तिखट जेवणाचा बेत असतो. शिमगोत्सव सुरु झाला की कोकणात हाकारे देत गोमूनृत्य तसेच विविध वेशभूषा करून लोककलांचा जागरही केला जातो. या उत्सवासाठी चाकरमानी मंडळी दाखल झाली आहेत.