कणकवली मार्गावर कारला अपघात ;महिला गंभीर जखमी…

आचरा कणकवली मार्गावर आचरा- आदर्शनगर येथे मुंबई ते आचर ‘येणाऱ्या कारला अपघात झाला. या अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली. असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३ वा. झाला. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना आचरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आचरा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.
मुंबई येथून चिंदर (कोंडवाडी) येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी सुवर्णा विश्राम अपराज (६०), अभिलाषा अभिजीत चव्हाण (३५), कुणाल चंद्रकांत ऐलकर (२९), ज्ञानदा अभिजीत चव्हाण (११), रिधांश अभिजीत चव्हाण (७) आणि अन्वित विनोद अपराज (३) हे सहाजण कारने येत होते. दरम्यान दुपार झाल्याने त्यांनी थेट चिंदर येथे घराकडे न जाता आचरा येथे जाऊन हॉटेलमध्ये जेवण घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते आचरा येथे निघाले असता आदर्शनगर येथे चालकाचा कारवरील ताबा सुटून कार गोलांट्या खात रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जावून कलंडली. कारमध्ये तीन लहान मुले होती. सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना आचरा ग्रामीण रुग्णालय दाखल केले. यात सुवर्णा अपराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तिला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घाबरलेल्या लहान मुलांना आचरा पोलिस ठाण्याच्या सहा. पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, हवालदार स्वाती आचरेकर, सुदेश तांबे यांनी धीर दिला. कार रस्त्यावर आदळल्यानंतर एअर बॅग खुल्या झाल्या होत्या.