मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.संपूर्ण राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या हजारो स्कूल बस खाजगी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येतात. या स्कूलबसच्या माध्यमातून अनेक संस्थांचालक पालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आज परिवहन विभागामध्ये राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून या स्कूल बसेस साठी नवी नियमावली निश्चित करण्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून या समितीने आपला अहवाल पुढील एक महिन्यांमध्ये सादर करावयाचा आहे . तसेच या संदर्भात सन २०११ मध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी रोखण्यासाठी मदान समितीने ज्या उपायोजना सुचवल्या होत्या त्या देखील विचारात घेतल्या जाणार आहेत. या सर्वंकश अहवालाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस साठी नियमावली निश्चित केली जाणार आहे.










