श्री आई भराडी देवी यात्रेचा जल्लोष : मोड यात्रेने होणार सांगता !

दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेस शनिवारी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक यात्रेनिमित्त दाखल झाल्याने श्री क्षेत्र आंगणेवाडी गजबजून गेले आहे. ‘आई भराडी देवी नमो नमः ‘ च्या जयघोषाने नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. लाखो भाविक भराडी मातेसमोर नतमस्तक होत कृतार्थ झाले. शनिवारी दिवसभरात सर्वसामान्य लाखो भाविकांसह मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते, उद्योजक आदींनी देवी भराडीचे दर्शन घेतले.
भाविकांनी देवीचे दर्शन घेत ओटी भरली. नवस बोलणे, फेडणे आदी मंदिर आंगणेवाडी श्री देवी भराडी यात्रोत्सवास झालेली भाविकांची गर्दी व देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री ताटे लावण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला.आज रविवारी मोड यात्रेने या दीड दिवसांच्या यात्रेची सांगता यात्रेच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. भरजरी साडी, सुवर्णालंकारांनी सजली देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भराडी देवीस भरजरी साडी, तसेच सुवर्णालंकारानी सजविले होते. मंदिरात आकर्षक फुलांची
आरासही करण्यात आली होती. भाविकांना देवीचे दर्शन सुलभरीत्या व्हावे यासाठी नऊ रांगांची सुविधा ग्रामस्थ मंडळाने उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे भाविकांना अल्पावधीत देवीचे दर्शन घेता येत होते. पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडीतील श्री भराडी मातेच्या यात्रेसाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने तसेच प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रेल्वे, एसटी, खासगी लक्झरी तसेच अन्य वाहनांनी भाविक जिल्ह्यात दाखल होत होते.
देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी शुक्रवारी रात्रीपासूनच उपस्थिती दर्शविली. खासगी तसेच एसटी
बसेसमधून भाविक रात्रीपासूनच यात्रेत दाखल होत होते. देवीच्या दर्शनासाठी उभारलेल्या पुलांवर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री ३.३० वा. पासून देवीच्या दर्शनास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे
यावर्षीही भाविकांसाठी मुखदर्शनाची सुविधाही ग्रामस्थ मंडळाने उपलब्ध करून दिली होती. याचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री उदय सामंत, मंत्री आशिष शेलार, माजी आ. वैभव नाईक, आ. दीपक केसरकर, आ. प्रवीण दरेकर, आ. सुनील प्रभू, मुंबईचे माजी नगरसेवक सदा परब, पंढरपूरचे नगरसेवक राजा सर्वगोड, सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवी भराडीचे मनोभावे दर्शन घेतले.