स्वयंघोषित वादग्रस्त चित्रपट समीक्षक कमाल आर. खान ऊर्फ केआरके याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक्स (ट्विटर) अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केआरकेने ही पोस्ट विकिपीडियाचा आधार घेत लिहिली होती. त्यामुळे संभाजी महाराजांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब हटविण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सायबर पोलिस विभागाला दिले आहेत. यानंतर राज्याच्या सायबर पोलिस विभागाने विकीमीडिया फाऊंडेशनला माहिती तंत्रज्ञान कायदा
२००० च्या ७९ (३) (ब) आणि भारतीय न्याय संहिता कलम १६८ अन्वये एक नोटीस बजावून संभाजी महाराजांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या विकिपीडिया पेजवर छत्रपती संभाजी महाराजांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण असल्याबाबत आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे. आपण प्रसिद्ध केलेला मजकूर चुकीचा असून त्यात योग्य संदर्भ आणि स्रोतांचा अभाव आहे. छत्रपती संभाजी महाराज हे भारतातील अतिशय वंदनीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे याशिवाय या मजकुरामुळे जातीय तणाव वाढत असून यामुळे संभाजी महाराजांच्या अनुयायांमध्ये संताप आहे. याची परिणती कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीत होऊ शकते. त्यामुळे आपण आक्षेपार्ह मजकूर हटवा, असे निर्देश विकीमिडिया फाऊंडेशनला पत्राद्वारे कळविले आहे.
फडणवीस आक्रमक झाले आहेत, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ट्विट करताना केआरकेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश सायबर विभागाचे पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना फडणवीसांनी दिले.










