मुंबई-गोवा महामार्गालगत अग्नितांडव

नांदगाव प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गालगत कणकवली तालुक्यातील नांदगाव- मोरयेवाडी येथील मनोहर आत्माराम श्रीम. पूजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला सोमवारी रात्री 8.30 वा. च्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पूर्ण घर तसेच लागूनच असलेले दुकान जळून बेचिराख झाले.दरम्यान, घरात असलेल्या सिलेंडचाही मोठा स्फोट झाल्याने आग आणखीच भडकली. सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात आणताना कठीण झाले. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत बिडये कुटुंबियांचे अंदाजे 19 लाख 71 हजार व लवू राजाराम लाड यांच्या किराणा व कोल्ड्रिंक दुकानाचे अंदाजे 3 लाख 40 हजार अशी मिळून 23 लाख 11 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.घटना समजताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. याचवेळी घरात असलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने नागरिकही भयभीत झाले. ही आग कशी लागली याचे नेमके कारण कळले नसले तरी शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.