कुडाळ : प्रतिनिधी दि ०४
पुढील आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत वार्षिक विकास आराखड्यातील सर्व निधी खर्च होईल, असे नियोजन करण्यात येणार असून उरलेल्या तीन महिन्यांत अधिकचा निधी शासनाकडे मागितला जाईल, असा निर्धार पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभा संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत, जनतेच्या विकासासाठी जे काही करायला हवं ते आम्ही करणार, अधिकाऱ्यांचा कामातील चालढकलपणा खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. आ. दीपक केसरकर उपस्थित होते. राणे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक पैशावर आपल्या जनतेचा अधिकार आहे. आपण जिल्ह्याचा प्रारूप आराखडा 400 कोटींवर गेला असं म्हणतो. यातील अधिकाधिक निधी आणून तो खर्च कसा होईल त्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल. जिल्ह्यात किती निधी आला, कसा खर्च झाला, याची माहिती घेतली जाईल. आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे राहणीमान उंचावले पाहिजे, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून आलेला निधी खर्ची व्हायलाच पाहिजे. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात निधी खर्च करणे याला अधिकाऱ्यांचे कामं म्हणता येणार नाही असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.यापुढे अधिकाऱ्यांची बेशिस्तपणा, अवाच्या सव्वा खर्च, बिनधास्तपणे सुट्या घेणं हे चालू देणार नाही. जिल्ह्याचं भविष्य घडविण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. ज्या अधिकाऱ्यांना शाबासकी मिळवायची असेल त्यांनी आपली जबाबदारी पुर्ण करावी. आपल्या अधिकारातील निर्णय वेळेत आणि पारदर्शकपणे घ्यावेत. नियोजन समितीच्या बैठकीत आमदार निरंजन डावखरे यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. शिक्षण विभागात पैशाची डिमांड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चितच कारवाई होणार आहे. आम्ही सुक्या धमक्या देत नाही. जिल्हापरिषद मध्ये सुरू असलेला कारभार योग्य नाही, अशा अधिकाऱ्यांवर यापुढे माझा बारीक लक्ष राहणार आहे असा इशाराही पालकमंत्री राणे यांनी दिला.










