एका दिवसात बदलला मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोहरा…

रत्नागिरी :

रत्नागिरी शहरानजिक मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त झालेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. सगळं राडारोडा डंपरच्या साहाय्याने बंदर परिसरातून हटवण्यात आला. यामुळे मिरकारकवाडा परिसराचे संपूर्ण रूप पालटून गेले होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या या धडक कारवाईचे रत्नागिरी शहर आणि परिसरासह संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. तर स्थानिक रत्नागिरीकरांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.रत्नागिरी सह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मोठ्या व्यापारी बंदराला अतिक्रमणाने घेतल्यामुळे इथला विकास खुंटला होता. केवळ मत्स्य व्यवसायच नव्हे तर किनारपट्टी सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात महत्वाचा बुलडोझर कारवाईचा निर्णय घेत अवघ्या १५ दिवसांमध्ये मिरकरवाडा बंदर अतिक्रमणमुक्त झाले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सुमारे ११ हेक्टर जागेमध्ये ३१९ बांधकामे अनधिकृत ठरवण्यात आली आणि पूर्वसूचना देऊन २७ जानेवारीरोजी पहाटे पासून सुरु असलेल्या कारवाईत सर्वच्या सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पहिल्या दिवशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी जमा झालेला राडारोडा हटवण्याचे काम सकाळपासून हाती घेण्यात आले होते. यासाठी ६ जेसीबी आणि ६ डंपर तैनात करण्यात आले होते. चिरे, पत्रे, लाकडे, अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात असलयाने बांधकामे जमीनदोस्त करण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचे काम आव्हानात्मक होते