‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ चे लोकार्पण व्हॅन सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य !

कोकणशाही न्युज ब्रेकींग 28

ब्युरो न्यूज मुंबई :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
सह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन अॅप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

जेव्हा गुन्हा नोंदविला जातो, तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देवून ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन अॅप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले करतील. त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.