गोवंश तस्करीचा पर्दाफाश ; २२ जनावरांची सुटका…

चिपळूण : दि: 23

चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात चेकपोस्टच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एका संशयित ट्रकला मंगळवारी मध्यरात्री अडविले. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल 22 गोवंश आढळून आले. कराड येथे कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने या जनावरांना मुक्त केले. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून ट्रकचालक शहाजी शंकर नलावडे (रा. कराड) याला ताब्यात घेतले आहे.

खेर्डी येथून कुंभार्ली घाटमार्गे निघालेल्या एका संशयित ट्रकची खेर्डी येथील भाजपचे कार्यकर्ते विनोद भुरण व अन्य कार्यकर्त्यांनी पाठलाग केला. हा ट्रक कुंभार्ली चेकपोस्ट या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने अडविण्यात आला. यानंतर ट्रकला लावलेली ताडपत्री उघडताच आतमध्ये कोंबलेल्या अवस्थेत तब्बल 22 जनावरे आढळून आली. कराड येथील कत्तलखान्यात ही जनावरे नेत असावीत, असा संशय असून याप्रकरणी अज्ञात दोघांवर व ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरगाव पोलिसांनी हा ट्रक शिरगाव पोलिस ठाण्यात आणून यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली व ही 22 जनावरे लोटेतील गोशाळेकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास हेडकॉन्स्टेबल लालजी यादव करीत आहेत. दरम्यान, चिपळुणात गोवंशाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.